Pleasant Palghar

पालघर जिल्ह्याविषयी

पालघर.. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला, समुद्र किनारा, गर्द जंगले, पर्वतरांगा, खळाळते धबधबे, गड किल्ले अशा विविध अंगांनी परिपूर्ण असा पर्यटन जिल्हा.


ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणून निर्माण झालेल्या जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हेच आहे. पालघर जिल्हा हा मुंबईपासून अत्यंत जवळ आहे. मुंबईहून इथे येण्यास दळणवळणाची साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे, ही या जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे गड, समुद्रकिनारे, धरणे, जंगले या गोष्टी इथे मोठ्या प्रमाणात आहेत.


पालघर, डहाणू, वसई, जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी, विक्रमगड असे विविधतेनी नटलेली आठ तालुके पालघर जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पर्यटनास समृद्ध अशी विविध स्थळे आहेत. जव्हार तालुक्यामध्ये शिरपा माळ, दाभोसा आणि हिरडपाडा धबधबा, जामसर, भोपटगडचा गड, डहाणू तालुक्यात डहाणूचा समुद्र किनारा, बोर्डी, चिंचणी, महालक्ष्मी मंदीर, तलासरीमध्ये जाई विलास पॅलेस, पालघर तालुक्यात सातिवली, कोकनेर, मेघराज मंदीर, जलसर, वसईतील अर्नाळा, बुद्ध स्तूप(सोपारा), मोखाड्यातील सुर्यमाळ-सनसेट पॉईंट, देवबंध, वाशाळा, ओसरविरा तलाव, वाडा तालुक्यातील कोहोई किल्ला अशी कित्येक पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.


जव्हार तालुक्याला पालघर जिल्ह्यातील महाबळेश्वर म्हणून संबोधले जाते. आदिवासी लोकवस्ती असलेला हा दुर्गम भाग आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांना आदिवासी बंधूंचे ग्रामीण जीवन, तेथील संस्कृती, परंपरा यांचा जवळून अनुभव घेता येतो. शिवाय या लोकांशी संवाद साधण्याचीही संधी मिळते. येथील तारपा नृत्याचेही सायंकाळी आयोजन केले जाते. याबरोबरच या लोकांनी स्वत: बनविलेल्या कलाकृतीच्या वस्तू पर्यटकांना आवडल्यास विकत घेता येतात. बोहाडा म्हणून मुखवट्यांचा फेस्टिव्हल हा पालघरमधील एक प्रसिद्ध उत्सव आहे. चैत्र महिन्यात तीन दिवस हा उत्सव चालतो. या उत्सवात विविध भारतीय देव-देवतांचे 52 मुखवटे परिधान केले जातात. मोखाडा, कटदान, भारसाट मेट, डेंगाची मेट, वेहेल पाडा (ता. विक्रमगड), जव्हार, पोयशेत कोकाडा या गावांमध्ये बोहाडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.


पालघर जिल्ह्यातील सुंदर समुद्रकिनारे पालघर जिल्ह्याच्या सौंदर्य खुलवतात. तलासरी तालुक्यातील झाई, डहाणू तालुक्यातील बोर्डी, नरपड, डहाणू, चिंचणी, पालघर तालुक्यातील नांदगाव, आलेवाडी, मुरबे, उनभाट, शिरगाव, सातपाटी, माहीम केळवे, वसई तालुक्यातील अर्नाळा, कळंब, रानगाव, सुरुची ही पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. पालघर जिल्ह्यातील मच्छीमार समाजाची संस्कृतीही पर्यटकांना भुरळ घालते. सातपाटी, अर्नाळा येथील सरंगा(पापलेट), बोंबील, सुरमई ह्या मास्यांना खवय्यांची विशेष मागणी असते. ह्या समुद्र किनाऱ्याजवळून जाणाऱ्या रस्त्यावरुन सफर करणे हीदेखील पर्यटकांसाठी पर्वणी ठरते.


विविधतेने नटलेल्या पालघर जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व येथील गड किल्यांवरून अधोरेखित होते. अर्नाळा येथील जलदुर्ग, वसईचा जगप्रसिद्ध किल्ला, भवानगड, कोहोजचा किल्ला, अशेरीगड, केळव्याचा पाणकोट, शिरगावचा किल्ला, गंभीरगड, तारापूरचा किल्ला, कामणदुर्ग, बल्लाळगड , सेगवागड, काळदुर्ग असे अनेक छोटे मोठे किल्ले पालघर जिल्ह्यात आहेत.


अध्यात्मिक पर्यटनासाठी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील विवळवेढे येथील महालक्ष्मी माता मंदिर, आशागड येथील संतोषीमाता मंदिर, मल्लिनाथ मंदिर, भारतातील एकमेव पारशी / झोराष्ट्रियन गुंफा मंदिर व जागतिक वारसा स्थळ घोषित केलेल्या बहरोट गुंफा, पालघर तालुक्यातील केळवे येथील शितालाई देवी मंदिर, माहीम येथील कालिकामाता मंदिर, शिरगाव येथील वज्रेश्वरी देवी मंदिर, वडराई येथील महिकावती देवी मंदिर, सातपाटी आणि मुरबे येथील शिव मंदिर, माकुणसार येथील चामुंडा देवी व ब्रम्हदेव मंदिर, एकविरा देवी मंदिर, एडवण येथील आशापुरा देवी, शिरगाव येथील कमलीशा बाबा दर्गा, माहीम व चिंचणी येथील दर्गा, जलसार येथील मेघराज मंदिर, वसई तालुक्यातील विरार येथील जीवदानी देवी मंदिर, तुंगारेश्वर येथील शिव मंदिर, श्री शंकराचार्य मंदिर, कॅथेड्रल चर्च, मोखाडा तालुक्यातील प्रसिध्द ओसरवीरा शिव मंदिर, देवबांध येथील शिव मंदिर, वाडा तालुक्यातील गाळाचा पाडा येथील श्री रामेश्वर मंदिर, गुंजकटी येथील पुरातन शिव मंदिर, बुधवली येथील प्रसिध्द भाग्यरथी, वज्रेश्वरी, रेणुकामाता आणि महाकाली मंदिर, निंबवली येथील गरम पाण्याचे कुंड, तिळसा येथे शंकराचे मंदिर ही स्थळे प्रसिध्द आहेत.


पर्यटकांसाठी सर्वासाठी सर्वकाही अशी हमी देणारा पालघर जिल्हा म्हणजे बारमाही पर्यटनाचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र होत चालले आहे. येथे एक्सप्लोर करण्यासाठी बरेच काही आहे.


चला तर, पालघरला भेट द्या. पालघरचा अनुभव घ्या!!