Pleasant Palghar
image

डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा

डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई- अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान मानले जात असून ही देवी नवसाला पावते असा लाखो भाविकांचा विश्वास आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील भाविकांबरोबर गुजरात,राजस्थान,मुंबई, पुणे मधील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात.


पालघर जिल्ह्यातील ह्या सर्वात मोठ्या यात्रेची सुरुवात चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून होते व पुढील १५ दिवस हा उत्सव चालतो. महालक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जव्हारच्या राज घराण्याकडून प्रतिवर्षी खणा नारळांची ओटी भरून साडी चोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो, ही प्रथा अजूनही परंपरेनुसार सुरू आहे. यात्रेदरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला व अष्टमीला दुसरा होम असतो. या शक्तीमातेला येथील आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती समुदाय  आपली कुलस्वामीनी मानतो. या मंदिरातील पुजारी आदिवासी समाजातील  सातवी कुटूंबातील आहेत. 


यात्रेमुळे येथील स्थानिक आदिवासींच्या हाताला रोजगार उपलब्ध होतो. रानावनातील फळे, डिंक, औषधी फळे, पाने, लाकूडफाटा, कमळाची फुले, कडधान्य, पालेभाज्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. कडधान्य, मिरची, हळद, मसाले, तेल, कांदा, बटाटा, लसूण, सुके मासे, शेतीविषयक साधनांची विक्रीही यात्रेत होत असल्याने अनेक भाविक या वस्तू खरेदीसाठी यात्रेत आवर्जून येतात. त्यातूनही मोठी उलाढाल होते. यात्रेत प्रसिद्ध असणारे भुजिंग चिकन, मटण यांची मोठी दुकाने येथे असतात.


यात्रेमध्ये मनोरंजनासाठी सर्कस, जादुगार, उंचच उंच आकाश पाळणे, थरारक मौत का कुआ, लहान मुलांसाठी अनेक प्रकारचे खेळणे अशी अनेक दुकाने असल्यामुळे यात्रेची प्रसिध्दी वर्षानुवर्षे वाढतच चालली आहे.


१५ दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल होणारी महालक्ष्मी यात्रा पर्यटकांसोबतच स्थानिकासाठीही मोठी पर्वणी असते.

गॅलरी