
कांदळवनातील निसर्ग पर्यटन
कांदळवन आणि त्यानिगडित अधिवासांचे रक्षण करण्यामध्ये स्थानिक लोक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचा पर्यावरणाशी असलेला सहजीवनाचा संबंध त्याचे मुख्य कारण आहे. निसर्ग पर्यटन हे स्थानिक लोकांना आर्थिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संरक्षणाचा एक व्यवहार्य पर्याय उपलब्ध करुन देऊ शकते. महाराष्ट्रातील कांदळवन निसर्ग पर्यटन स्थळे महाराष्ट्र शासनाच्या ' कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजना' अंतर्गत विकसित केली जातात. त्याचअंतर्गत विरार मारंबळपाडा परिसर निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात आला आहे. कांदळवन संवर्धनाच्या उद्देशाने या भागात माहिती केंद्र व फेरी बोट सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येथील निसर्ग पर्यटनाला चालना मिळाली आहे.
विरार जवळील मारंबळपाडा निसर्गरम्य व विविध प्रजातीचे कांदळवन असलेला परिसर आहे. या कांदळवनांचे संवर्धन व्हावे व याची माहिती नागरिकांपर्यँत पोहचावी यासाठी या भागात माहिती केंद्र तयार केले आहे. या केंद्रात मारंबळपाडा परिसराची ओळख, स्थानिक पक्षी व याभागात आश्रयाला येणारे पक्षी, जलचर प्राणी व त्यांची अन्नसाखळी, विविध कांदळवन प्रजातींची माहिती, या उपक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेली मत्स्यशेती, तसेच कचरा व इतर प्लास्टिक यापासून कांदळवनांचे संवर्धन अशा विविध प्रकारची माहिती पर्यटकांना दिली जात आहे.
पर्यटकांना या परिसराचा प्रत्यक्ष आनंद घेता यावा यासाठी फेरीबोट सेवा ही सुरू करण्यात आली आहे. सुरू करण्यात आलेली फेरीबोट सेवा ही १२ आसनी असून किनार पट्टीच्या परिसरातील भागात ही सेवा दिली जात आहे. यामध्ये कांदळवन प्रजाती, परिसराची प्रत्यक्ष माहिती, विविध पक्षी प्राणी यांचे दर्शन असा विविध प्रकारचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. कांदळवनाबद्दल जनजागृती, त्याचे महत्त्व, संवर्धन व्हावे या उद्देशाने हे प्रकल्प सुरू केले आहेत. याचा मोठा फायदा येथील नागरिकांसह पर्यटकांना ही होणार आहे. कांदळवन माहिती यासह इतर निसर्गसफरीचा दुर्मिळ आनंद घेण्यासाठी आजच ह्या कांदळवनातील निसर्ग पर्यटन केंद्राला भेट द्या..
पत्ता:
कांदळवन निसर्ग पर्यटन केंद्र
मारंबळपाडा जेट्टी, चिखलडोंगरी रोड,
मारंबळपाडा गाव, विरार(पश्चिम)
अधिक माहितीसाठी संपर्क - ९७६३० २७००७ / ८३२९० ६८०७१ / ९२८४१ ६२०४८ / ७७९८३ १८८४२