Pleasant Palghar
image

मोखाडा

पालघर जिल्ह्याच्या पूर्वेला असलेला मोखाडा तालुका हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. बराच भाग जंगलव्याप्त, डोंगराळ द-याखो-यांनी व्यापलेल्या ह्या तालुक्याची बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. तालुक्याचे ठिकाण मोखाडा असून ते समुद्र सपाटी पासून 1600 फुट उंचावर वसलेले आहे. या तालुक्यात 27 ग्रामपंचायती असून त्यामध्ये 56 महसुल गावे आहेत. ह्या तालुक्यामध्ये वारली, कोकणा, कातकरी, ढोरकोळी, क.ठाकुर, म.ठाकुर व महादेव कोळी हया आदिवासी समाजाची संख्या मोठया प्रमाणावर आहेत.

ह्या तालूक्यात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तिन्हीही ऋतु प्रकर्षाने जाणवतात. या तालुक्याचा बहुतेक भाग डोंगराळ व द-याखो-यांचा असल्याने या ठिकाणी भात,नागली,वरई ही प्रमुख पिके घेण्यात येत असून त्याच बरोबरतुर, उडीद व खुरासणी इत्यादी पिकेही घेतली जातात. तसेच पुरक शेती म्हणून मोगरा लागवड,फुलशेती, वांगी,मिरची,टोमॅटो,काजू,आंबा,तुती व अलीकडे स्टॉबेरीची ही लागवड केली जाते.

पर्यटनाच्या दृष्टीने समृध्द असलेल्या ह्या तालुक्यातील वाशाळा येथील पांडवलेणी, सुर्यमाळ येथील निसर्गोपचार केंद्र आणि सनसेट पॉइंट, देवबांध येथील प्राचीन गणेश मंदिर, ओसरविरा येथील प्राचीन शिवमंदिर, खोडाळा ह्या पर्यटन स्थळांसोबतच हनुमान मंदिर मोखाडा, विठठल मंदिर मोखाडा, साईबाबा मंदिर मोखाडा, जगदंबामाता मंदिर मोखाडा ही स्थळे प्रसिध्द आहेत.