
पालघर
पालघर तालुका हा पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. पालघर जिल्हा ज्या प्रमाणे सागरी, नागरी, डोंगरी भागात विभागला गेला आहे त्याचप्रकारे पालघर तालुकाही सागरी, नागरी, डोंगरी भागात विभागला आहे. पालघर तालुक्यामध्ये प्रामुख्याने वारळी, कातकरी, मल्हार कोळी, इत्यादी आदिवासी जमाती आहेत. त्याचप्रमाणे कुणबी, वाडवळ, कोळी, आगरी, वंजारी, भंडारी, माळी व इतर समाजही मोठ्या प्रमाणात आहे.
तालुक्याला सोनेरी इतिहासाचा वारसा आहे. भारतीय स्वातंत्य लढयामध्ये ‘सन १९४२ चे चले जाओ’ आंदोलनामध्ये पालघर हे महत्वाचे केंद्र आहे. इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी उठाव झाला होता. या उठावामध्ये सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे, नांदगावचे गोविंद गणेश ठाकुर, पालघरचे रामचंद्र भिमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, शिरगावचे सुकुर गोविंद मोरे हे पालघर तालुक्यातील पाच हुतात्मे स्वातंत्र्यासाठी लढा देताना शहीद झाले. या शहीदांचे स्मृती म्हणून पालघर तालुक्यामध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे. तसेच सन १९३० चा गांधीजींच मिठाचा सत्याग्रह सुरू झाला तेव्हा पालघर तालुक्यातील वडराई ते सातपाटी पासून अनेक कार्यकर्ते या सत्याग्रहात सामील झाले होते. सातपाटी येथे परदेशी वस्तूंची होळी करण्यात आली होती.
पालघर तालुक्यातील बंदरपट्टी भागामध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे.त्यावर आधारित मासे सुकवणे, कोळंबी सवर्धन प्रकल्प इत्यादी व्यवसाय केले जातात. तालुक्यातील सातपाटी, दातिवरे, मुरबे, नवापुर, दांडी, आलेवाडी, नांदगाव इत्यादी ठिकाणी मासेमारीसाठी प्रमुख बंदरे आहेत. पालघर तालुक्यामधील मासे व भाजीपाला विशेष प्रसिध्द आहे. सातपाटी-शिरगाव येथील बोंबील, पॉपलेट, सुरमई ह्या मास्यांना खवय्यांची विशेष मागणी असते. डहाणूबरोबर चिकू उत्पादनात देखील पालघर तालुका प्रसिध्द आहेत.
मुंबईपासून जवळ असल्यामुळे अनेक पालघर तालुक्यामध्ये संपूर्ण वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते. पालघर तालुक्यातील केळवा बीच, माहीम बीच, शिरगाव बीच, सातपाटी, मुरबे, आलेवाडी बीच, नांदगाव बीच, भवानगड किल्ला, तांदुळवाडी किल्ला, काळदुर्ग किल्ला, केळवा-माहीमचे किल्ले, शितलाई देवी, एडवण येथील आशापुरा देवी, मनोर येथील महागणपती मंदिर असे एक न अनेक पर्यटन स्थळे आहेत.